चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 14 ऑगस्ट : नार-पार गिरण नदी जोड प्रकल्पाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा जळगावातील सागरपार्क मैदानावर पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नार-पार नदी जोड प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ठीकरण दिले.
नार-पार प्रकल्पावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पावरून विरोधकांकडून अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच मुद्यांवरून सागर पार्कवर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नार -पार ही योजना गुंडाळली गेली, अशा प्रकारच्या अफवा नार-पार प्रकल्पाबाबत विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. याविरोधात काही जणांकडून आज जळगावात झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
View this post on Instagram
मात्र, ते जे झेंडे घेऊन आले होते. झेंडे घेऊन ते परत गेले. कारण झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचाय, त्यांचा नाहीये, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नार-पार प्रकल्पामुळे 17 हजार हेक्टर जमीन ही सिंचना खाली येणार असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर खुलासा करावा असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
पालमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात बोलताना म्हणाले की, नार-पार गिरणा प्रकल्पाच्या संदर्भात कुणाच्या मनात काही शंका असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत. कारण परवाच मी नार-पार गिरणा प्रकल्पाची राज्यपालांकडून परवानगी घेतली आणि यांसदर्भातील राज्यपालांच्या सहीचे पत्र मी ट्विट केलेले आहे. यामुळे नार-पारचे पाणी जळगाव जिल्ह्यात आणण्यावाचून कुणाही थांबवू शकत नाही. हे मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.
यांची होती उपस्थिती –
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी जळगावातील सागरपार्कवर आयोजित केलेल्या मेळाव्यात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, सुरेश भोळे, संजय सावकारे, लता सोनवणे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत