चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 14 ऑगस्ट : बहिणींचे प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही. 1500 रूपये हे आमच्या बहिणींना दिेलेली भाऊबीज आहे. ते प्रेम आहे. आम्ही तुमच्या प्रेमातून उत्तराई होऊ शकत नाही. पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला आमचाही हातभार लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आम्ही सुरू केली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत जळगावात सागरपार्कवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांवर टीका –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून महायुतीच्या सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही तर आमच्या बहिणींच्या प्रेमापोटी पैसे देत आहोत, तुम्ही तर एकही रूपया दिला नाही असे म्हणत त्यांनी आम्ही पंधराशे रूपये देतो तर तुमच्या पोटात का दुखतंय असा निशाणा विरोधकांवर साधला. तुम्हाला कधीतरी बहिणींचं प्रेम समजेल की नाही, असा सवाल त्यांनी विरोधकांना उपस्थित केला. दरम्यान, सावत्र भावांपासून तुम्हाला लांब राहावे लागेल. ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रूपये पचत नाहीये, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
ज्या देशात महिला सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेऊन देश विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून पंतप्रधान मोदींनी सांगिल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचे काम राज्यात केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 ऑगस्ट रोजी जळगावात येणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचे काम झाले. आज या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून मोदींनी लखपती दीदीचा कार्यक्रम आखला. आणि आज मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 15 लाख बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या. आणि याच लखपती दीदींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी जळगावात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा