मुंबई, 6 सप्टेंबर : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जेव्हापासून लागू करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलाय अगदी तेव्हापासून या योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कधी विरोधकांकडून तर कधी सत्ताधाऱ्यांकडून या योजनेबाबत मोठ्-मोठी वक्तव्ये करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात कशी लागू करण्यात आली, याबाबत स्पष्ठीकरण दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहिण योजनेवर बोलताना म्हणाले की, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्यासोबत आमची मध्यप्रदेशातील लाडली बहिण योजनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी या योजनेबाबत आम्हाला आयडिया दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात अजित दादा आणि माझी अशी आमची तिघांची एक बैठक झाली.
दरम्यान, शिवराजसिंह यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातही ही योजना तयार करावी, त्या बैठकीत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवराजसिंह चौहाण यांनी आम्हाला सर्व माहिती दिली. असे असताना आमची या सर्व बाबींना आधीपासून मान्यता होती. आणि त्यानुसार आम्ही लाडकी बहिण योजनेबाबतचा निर्णय घेतला.
लाडकी बहिण योजनेवरून श्रेयवादाची लढाई? –
लाडकी बहिण योजनेवरून महायुतीतील नेते एकमेकांना कमी दाखवत स्वतः श्रेय घेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रेयवादाची लढाई नाहीये. कुठलेही सरकार असले तरी त्या सरकारचा प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात. त्या सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे श्रेय हे मुख्यमंत्र्यांचेच असते. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिलेत आणि म्हणून मी उपमुख्यमंत्री आहे.
दरम्यान, लाडकी बहिण योजनेत श्रेयवादावरून कुठल्याही पद्धतीने वाद करायचे कारण नाही. सरकारच्या योजनेचे श्रेय हे मुख्यमंत्र्यांचे असते. त्यातच लाडकी बहिण योजनेचे सर्वात जास्त श्रेय हे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : शेतीपिक नुकसानभरपाई मदतीच्या अनुदानापासून वंचित, जिल्हाधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन, काय नेमकी बातमी?