चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी़
पुणे, 20 मे : पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात काल 19 मे रोजी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोर्श कारचा चालक हा अल्पवयीन वेदांत अग्रवाल (वय 17) वर्षांचा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असता 17 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन मंजुर झाला होता. मात्र, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश –
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. दरम्यान, अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर करत अपघातावर 300 शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश दिले होते. या प्रकरणाची सर्वदूर चर्चा केली जात असताना आता या अपघाताची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडून सदर प्रकरणाविषयी माहिती घेत या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
जामीन मंजूर करतानाच्या अटी –
पुणे पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने जामीन मंजूर करताना खालीलबाबी नमूद केल्या.
- आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे.
- अपघातावर त्याने ३०० शब्दाचा निबंध लिहावा.
- मद्य सोडायला मदत होईल, अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
- मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा.
आमदाराचा हस्तक्षेप असल्याचा आरोप –
पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता. दरम्यान, यावर सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अग्रवाल यांचा फोन आल्याने आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो. पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसून या घटनेची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपण कायद्यानुसार कारवाई करावी, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, पंतप्रधान मोदींनी वाहली श्रद्धांजली