महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 29 मे : जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम हा माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवर होताना दिसून येत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मुक्या प्राण्यांचा मृत्यू देखील होत आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील अंतुर्ली गावात माकडाचा उन्हामुळे मृत्यू झाला. या माकडाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर अंत्यविधीची क्रिया पुर्ण करत त्याला दफन करण्यात आले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
एकीकडे उन्हाचा पार वाढला असताना पाण्याच्या शोधात गावागावात माकडे येत आहेत. भडगाव तालुक्यातील अंतुर्ली गावात एक माकड आले असताना दोन दिवसांपुर्वी त्याला उन्हाचा फटका बसला. यानंतर गावातील काही तरूणांनी ह्या माकडावर पाचोरा येथील रूग्णालायात उपचार करण्याचे ठरविले. उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच ह्या माकडाचा मृत्यू झाला. यानंतर गावतील नागरिकांनी माकडाची अंत्ययात्रा काढली.
माकडाची निघाली अंत्ययात्रा –
एखादी व्यक्ती मयत झाली की, अख्ख गाव अंत्ययात्रेसाठी एकत्रित येते अगदी त्याप्रमाणे गावातील बालगोपाळापासून ते वृद्धापर्यंत त्या मृत माकडाला पाहण्यास येत होते़. माणसाप्रमाणे त्या मृत माकडास विधीवत अंघोळ घालून वाद्यासह अंतुर्ली गावात आज संध्याकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली़. यामध्ये चार खांदेकरीसह सगळ्यांनीच डोलीवजा तिरडीला खांदा दिला आणि दिवटी धरणार्याने पाणी दिले.
गावातील नागरिकांनी उपस्थित राहून माकडाला अखेरचा निरोप दिला. यानंतर मृत माकडाला दफन करण्यात आले. दरम्यान, या माकडाच्या निधनानंतर गावात तीन दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला असून तीन तीन दिवसानंतर दशक्रिया विधी पार पडणार आहे.
हेही वाचा : गिरणा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना