धडगाव (नंदुरबार), 4 मार्च : सोन भानोली आणि रोषमाळ खुर्द मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली अक्कलकुवा-धडगाव सोन भानोली- हूंडारोषमाळ बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या मार्गावरील बस काही वर्षांपासून बंद होती. गावातील नागरिकांनी अर्ज विनंती करुन बस सुरू केली होती. मात्र, थोड्याच दिवसात तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा बंद झाली. आठ महिन्यापासून बंद असलेली बस रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच रिता लक्ष्मण पटले, उपसरपंच आणि सर्व सदस्य तसेच गावकरी यांच्या पाठपुराव्याने पुन्हा बससेवा सुरू झाली. दरम्यान, ही बससेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बसची पहिली फेरी – धडगाव स्थानकावरून संध्याकाळी 5:00 वाजता सोन भानोली- हुंडा रोषमाळकडे रवाना होईल आणि तिथे ती मुक्कामी थांबेल. यानंतर सकाळी ठिक 6:00 वाजता हुंडा रोषमाळ सोन भानोली- धडगाव कडे सुटेल.
बसची दुसरी फेरी – सकाळी ठिक 8:30 मिनिटांनी धडगाव बस स्थानकावरून सोन भानोली- हुंडारोषमाळ कडे सुटेल आणि रोषमाळ येथे ठिक 9:30 वाजता पोहोचेल. यानंतर लगेच धडगावकडे रवाना होईल.
दरम्यान, मधल्या कालावधीत अजून बसफेऱ्या वाढविण्याचे नियोजन असून त्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान सरपंचांनी केले आहे.