जळगाव, 5 सप्टेंबर : “विद्यार्थी पटसंख्या हा शाळेचा आत्मा आहे. पटसंख्येवर मराठी शाळेचे वैभव टिकूनअसल्याने पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावे इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत मराठी शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांनी समाज शिक्षक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
तसेच १६ कलमी शैक्षणिक उपक्रमात ६० टक्के नव्हे तर १०० टक्के गुणवत्ता वाढविण्यासाठी शपथ घेऊ, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तर शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्याची गरज असल्याची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली.
ला.ना.शाळेच्या गंधे सभागृहात आज (5 सप्टेंबर) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ शिक्षकांना जळगाव जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ज्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली. त्यांचा गौरव झालाच पाहिजे. ज्याप्रमाणे जग बदलतेय, त्याचप्रमाणे शिक्षक बदलतोय आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. बाल प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यात २७८ शाळांना वॉलकंपाऊड बांधण्यात येऊन शाळांची प्रॉपर्टी सुरक्षित केली आहे. तसेच जिल्हाधिकारी-सीईओ आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयातून आणि एकमेकांच्या सहकार्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्याची गरज –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, निपून भारत उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला शिक्षकांनी प्लॅन तयार करुन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे. तसेच आता काळानुरुप शिक्षकांनी देखील तंत्रस्नेही शिक्षक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी पुरस्काराचे महत्त्व विषद करून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती राणे व शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षाणाधिकारी सचिन परदेशी यांनी मानले.
याप्रसंगी जिपचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी आर. डी. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माजी शिक्षणाधिकारी तथा डाएटचे प्राचार्य नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या शिक्षकांचा झाला सन्मान –
- गजाजन रमण चौधरी (ढेकुसूम, ता. अमळनेर)
- गणेश व्यंकटराव पाटील (अंचळगाव, ता. भडगाव)
- महेंद्रसिग शिवशिंग पाटील (नांदगाव, ता. भडगाव)
- रिजवानखान अजमलखां (उर्दू शाळा कुर्हे पानाचे, भुसावळ)
- किशोर बाळाराम पाटील (देवगाव, ता. चोपडा)
- शुभांगी एकनाथराव सोनवणे (न्हावे, ता. चाळीसगाव)
- विजय काशिनाथ बागुल (वराड, ता. धरणगाव)
- गणेश सुखदेव महाजन (टाकरखेडा, ता. एरंडोल)
- ज्योती सतीश तडाखे (नांद्रे, ता. जळगाव)
- कैलास समाधान पाटील (सोनारी, ता. जामनेर)
- धनलाल वसंत भोई (केंद्राचे शाळा ना. १ मुक्ताईनगर)
- विजया भालचंद्र पाटील (बाळंद, ता. पाचोरा)
- अलका बाबुलाल चौधरी (बोळे, ता. पारोळा)
- जितेंद्र रमेश गवळी (पुनखेडा, ता. रावेर)
- अतुल रमेश चौधरी (सांगवी, ता. यावल) आदी शिक्षकांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षक पुरसकार देऊन सन्मानित करण्यात आले.