बीड, 17 मार्च : बीड जिल्ह्यातील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबूक पोस्ट करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 15 मार्च रोजी समोर आली होती. ते शिक्षक होते आणि गेल्या 18 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. दरम्यान, आज बीडचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार याप्रकरणी संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिक्षक धनंजय नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी असून तो केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालीच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा 18 महिन्यांपासूनचा पगार थकित होता.
याप्रकरणी संस्थाचालकांकडे पगाराची विचारणा केली असताना त्यांनी थेट फाशी घे अशा स्वरूपाचे भाषा वापरल्याची माहिती धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये दिली होती. यानंतर धनंजय नागरगोजे या शिक्षकाने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल –
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शिक्षक आत्महत्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच संस्थाचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि किमान वेतन कायदा डावल्याचाही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अंबादास दानवेंनी विधान परिषदेत मुद्दा केला उपस्थित –
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषेदत बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शिक्षक प्रकरणाबाबत सरकारला सवाल उपस्थित करत अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा जाब विचारला. तसेच पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घ्यायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, सखोल चौकशी करून गुन्हा दाखल होईल, असे उत्तर राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले.