नाशिक, 19 डिसेंबर : जागतिक स्तरावर संशोधनाचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक प्रगत ज्ञानाशी सांगड घालून संशोधन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार -2022’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कारची भूमिका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धतील सहभाग ठराविक क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून विद्यार्थ्यांसमवेत संवाद होणे गजचेचे आहे. ज्ञानाची व संशोधनाची पातळी उंचावत असतांना संवादाचे माध्यम महत्वपूर्ण भूमिका बजावते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संशोधन विषयक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, संशोधनाकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टीकोनातून न पाहता समाजाची गरज लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे संशोधन करावे. संशोधन करण्यासाठी विद्यापीठातर्फे सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठांचे मा.कुलपती यांच्या प्रेरणेने ’अविष्कार’ संशोधन प्रकल्प महोत्सव सुरू करण्यात आला आहे. परीक्षकांनी नवोदीत संशोधकांचे सर्वसामान्याना आरोग्याविषयी उपयुक्त ठरणाऱ्या चांगल्या प्रकारच्या शोध प्रकल्पाची निवड करावी. यासाठी विद्यापीठ अशा संशोधकांच्या संशोधनासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी आविष्कार स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 52 महाविद्यालयातील 282 विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे 152, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 102, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) व शिक्षक(टिचर)चे 28 स्पर्धक सहभागी आहेत. अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले.
याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे व परीक्षक डॉ. सुवर्णा गणवीर, डॉ. प्रिती बजाज, डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. राजेश वानखेडे, डॉ. गणेश घुगे, डॉ. परशुराम पवार, डॉ. अनया पत्रीकर, डॉ. त्रिवेणी काळे, डॉ. तपस कुंडू, डॉ. स्वानंद शुक्ला, डॉ. शर्मिला सूर्यवंशी, डॉ. अपूर्व शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वाप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी मानले. विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवाकरीता संबंधित विषयातील परीक्षकांनी महत्वपुर्ण कार्य पार पाडले. अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्रीमती प्रतिभा बोडके, श्री. आबाजी शिंदे आदींनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.