दर्यापूर (अमरावती), 20 ऑक्टोबर : भारताचे पहिले कृषीमंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी, राजकीय क्षेत्रातील तथा संविधान निर्मितीतील कार्य अतुलनीय आहे. तत्कालीन समाज अनेक अनिष्ट गोष्टींनी व्यापलेला होता. समाजाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी भाऊसाहेबांनी संपूर्ण समर्पणाने पुढाकार घेत सामाजिक उत्थानाच्या अनेक गोष्टींचा पाया रचला. डॉ. पंजाबराव देशमुखांचे कार्य सर्वस्पर्शी असून पिढ्यांपिढ्या ते पथदर्शी राहील. कारण डॉ. भाऊसाहेब हे कृतिशील समाजसुधारक होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. किशोर फुले यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर व श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचालित रामकृष्ण महाविद्यालय दारापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा निमित्त नुकताच दारापुर येथे ‘समाजसुधारक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख’ या विषयावर प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. किशोर फुले यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. कमलताई रामकृष्ण गवई तर प्रमुख अतिथी म्हणून हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. ॲड. जयवंतराव उपाख्य भैय्यासाहेब पाटील पुसदेकर, मा. केशवराव मेतकर, कार्यकारिणी सदस्य मा. प्राचार्य केशवराव गावंडे, मा. प्रा. सुभाषराव बनसोड, साहित्यिक प्राचार्य डॉ. रमेश अंधारे, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा. रोशन राव, प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
भाऊसाहेबांची संवेदनशीलता, तळमळ, त्यांचे विचार आणि कार्य हे तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विदर्भातील वक्त्यांनी पुढाकार घ्यावा व भाऊसाहेबांचे विचार व कार्य मांडत राहावे, असे आवाहन मा. हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख यांनी करून प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश अंधारे यांनी सुद्धा भाऊसाहेबांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. सचिव प्रा. रोशन राव यांनी सुद्धा याप्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कमलताई गवई यांनी दिला आठवणींना उजाळा –
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. डॉ. कमलताई गवई यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकून भाऊसाहेबांनी त्यावेळी सुरू केलेल्या श्रद्धानंद वस्तीगृहामध्ये माझी राहण्याची सोय झाल्यामुळे मी शिकू शकली व माझे कुटुंब पुढे नेऊन शिक्षित करण्यात योगदान देवू शकली, त्यामुळे भाऊसाहेबांचे आपल्या सर्वावर अनंत उपकार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृती चिरंतर जपाव्या व तसे कार्य करत राहावे, असे भावपूर्ण उदगार काढत त्यांनी आवाहन केले. दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आयोजित पाचही व्याख्यानांचा सविस्तर अहवाल विषद केला.
या कार्यक्रमाचे संचालन समन्वयक प्रा.डॉ. शितल तायडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.वृषाली देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मनीष होले होते. तर या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.