मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. यानंतर आता शरद पवार गटाला हा मोठा धक्का मिळाला आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर सुनावणी पार पडली होती. यामध्ये आता राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणुक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयानंतर हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट –
मागच्या वर्षी 2 जुलैला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटाने, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह 9 आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राष्ट्रवादीकडून ही कारवाई झाल्यानंतर दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले होते.
यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या या सुनावणीवेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तवाद करण्यात आला. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.