चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघात प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस आणि सरकारवर गंभीर आरोप करत मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. रामदेववाडी येथील अपघात झालेल्या कारमध्ये चार ते पाच जण आणि एक मुलगी आरोपींच्यासोबत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. खडसे यांच्या या गौफ्यस्फोटामुळे रामदेववाडी येथील अपघात प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे –
जळगाव जिल्ह्यातील जळगाव पाचोरा रस्त्यावर असलेल्या रामदेववाडी येथील अपघातात भरधाव कारने धडक दिल्याने महिला आणि तीन मुले, अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणासंदर्भात एकनाथ खडसे यांनी आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हमाले की, या प्रकरणातील अभिषेक कौल जो आहे, हा कौल जळगाव जिल्ह्यातील एक मंत्र्यांचा पीए म्हणवून घेतला जातो. किंबहुना त्या मंत्र्यांचे जे रस्त्यांचे वगैरे कामं तोच करतो, हे सर्वांना माहिती आहे. दुसरा जो व्यक्ती तो एका फार मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे आणि बिल्डरचा मुलगा असून त्याचेही संबंध, एका मंत्र्याबरोबर घनिष्ठ आहेत. आता जिल्ह्यामध्ये असल्यावर माझ्याशी संबंध असतात इतरांचेही असतात. मी एवढ्यासाठी सांगतो की, हे संजय पवार, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याचा एक मुलगा त्यात अडकलेला आहे.
म्हणजे हे सर्व उच्चस्तरीय राजकारणी आहेत की या राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांनी 17 दिवस याठिकाणी कारवाई केली नाही. यामध्ये जे ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे, ते ब्लड सॅम्पल तातडीने घेण्याऐवजी इथून ते पारोळ्याला गेले आणि त्याठिकाणी त्यांनी ब्लड सॅम्पल घेतलं आणि यामध्ये 6 तासांचा वेळ गेला. त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं, हा त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. 6 तासानंतर जर ब्लड सॅम्पल घेतले जात असतील तर त्या अंमली पदार्थातील जो अंमल आहे तो उतरला जातो. म्हणून त्यांना सोडवण्यासाठी एकप्रकारे पोलिसांनी मदत केली’, असा आरोपही त्यांनी केला.
खडसेंचा मोठा गौफ्यस्फोट –
पुढे ते म्हणाले की, ‘जो दुसरा आरोपी आहे, त्यालाही याच पद्धतीने सूट दिली. जी माहिती पोलिसांना मी दिली, त्यामध्ये हे 4-5 जण होते, त्यामध्ये एका मुलाचाही समावेश होता, अशा स्वरुपाची माहिती एका जबाबदार नेत्याने दिली. मी एसपी साहेबांचे त्यांच्याशी बोलणं करुन दिलं आणि त्यामधून त्यांना मी विनंती केली की, या सर्वांचे सीडीआर तपासा. त्यावेळेस फोन कुणाकुणाचे आले, कुणाला आलेत, आणि एसपी साहेबांना ही विनंती केली की, तुमच्याहीकडे कुणाकुणाचे मोबाईलवर फोन आले, तपासलं पाहिजे. कारण तुम्हालाही एखाद्या वेळेस एखाद्या मंत्र्यांचे फोन येण्याचे नाकारता येत नाही’, असेही ते म्हणाले.
सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतलेलं नाही –
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘एकंदरीतच हे प्रकरण संशयाच्या घेऱ्यात आहे. माझी अपेक्षा अशी आहे की, आरोपातलं सत्य बाहेर आलं पाहिजे. गोरगरीब माणसांची पोरं याठिकाणी चिरडली गेली आणि त्या संदर्भात पोलीस याठिकाणी कोर्टामध्ये म्हणावं तशी बाजू लावून धरत नाही आहेत. आरोपींना पोलीस कोठडी मिळाली. पुण्याच्या घटनेची जितक्या गंभीरतेने नोंद सरकार घेत आहे त्यापेक्षाही ही घटना मोठी आहे. पण सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतलेलं नाही. सरकारने या प्रकरणात गंभीरतेने लक्ष द्यावं. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली, त्या हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा : चोपडा येथे शेतकऱ्याचे अनोखे ‘झोपा काढा’ आंदोलन, नेमकं कारण काय?