जळगाव, 29 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी मुंबईतून जळगावातील निवासस्थानाची पाहणी केली आणि त्यांनी माध्यमांसोबत बोलताना मोठा दावा केलाय.
एकनाथ खडसेंचा मोठा दावा –
एकनाथ खडसे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी मुंबईला असताना रात्री उशिरा 12 वाजून 37 मिनिटांनी माझ्या घरात चोरी झाली. यामध्ये चोरांनी सोने,चांदी यासह महत्वाची कागदपत्रं ,पेन ड्राइव्ह आणि काही महत्वाच्या सीडी ही चोरीस गेलेले आहेत. तसेच माहिती अधिकाराद्वारे मी महत्वाची कागदपत्रे मिळवली होती. यामध्ये काही भ्रष्टाचार प्रकरणांचा देखील समावेश होता. मात्र, ती देखील चोरट्यांनी गायब केल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, चोरट्यांकडे मोठ्या तीन बॅगा होता असे सीसीटीव्हीद्वारे दिसून येत आहे. वास्तविकतः सोने-चांदीच्या भेटवस्तू मला माझ्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्या होत्या आणि ते साहित्य लहानशा बॅगमध्ये देखील बसू शकत होते. परंतु, या तीन बॅगांमध्ये घरातील नेमकं काय नेलं याबाबत मला आश्चर्य वाटतंय.
दोन ते अडीच हजार कागदपत्रे चोरीला –
दरम्यान, कागदपत्रांशिवाय घरातून जास्त काही चोरीला गेल्याचे दिसून येत नाही. बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशा आहेत. फक्त घरातून कागदपत्रे तसेच सीडी वैगेरे गायब आहेत. यामध्येही निम्म्या सीडी आणि कागदपत्रे चोरीला गेल्या आहेत. यामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे झेरॉक्स कॉपी शिल्लक आहेत आणि बाकीचे दोन ते अडीच हजार कागदपत्रे चोरीला गेलेले आहेत. यामुळे चोरीचा हेतू नेमका काय होता याबद्दल मलाही शंका असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
खडसेंची पोलीस प्रशासनावर टीका –
घरातील चोरी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी जळगाव पोलिसांवर निशाणा साधला. जिल्ह्यात मोठी गुन्हेगारी वाढली असून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. तसेच हप्तेखोरीत देखील वाढ झाली असून लेखी पुरावे देखील देऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटलंय.वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसले असून याबाबतचे 26 ते 27 पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन देखील परंतु कुठलेही बंधन त्यावर घातले गेलेले नाहीये.
पोलीस आणि गुन्हेगारांचे एकत्रित संगनमत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची नोंद घेतली जावी आणि घटनेचा लवकरात लवकर तपास करून याठिकाणी पोलिसांचा वचक राहिल अशा स्वरूपाची कारवाई करावी, अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केलीय.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’, लाभार्थी महिलांना मंत्री आदिती तटकरे यांचे ई-केवायसीबाबत महत्वाचे आवाहन
 
			 
					





