चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 7 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपुर्वी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये नाराज असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तिथे त्यांना विधान परिषद आमदार पदाची संधी मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या कमी कालवधीतच ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप प्रवेशबाबत माहिती दिली.
काय म्हणाले एकनाथ खडसे? –
एकनाथ खडसे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. माझा पक्षप्रवेश हा चंद्रपुरात होणार नसून तो दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होणार आहे. हा पक्षप्रवेश येत्या 15 दिवसांच्या आत व्हावा, असा माझा प्रयत्न आहे.
राजकीय परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला –
भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भाजपमधील जे जुने नेते आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करत असताना ते नेहमी सांगायचे की तुम्ही आले तर बरे होईल. अशा स्वरूपाच्या चर्चा ह्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरू होत्या. यानुसार राजकीय परिस्थिती पाहता मी हा निर्णय घेतला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
म्हणून मी भाजपात जात आहे –
भारतीय जनता पार्टी हे माझे घर आहे. या घराच्या पायाभरणीपासून ते पुर्ण होईपर्यंत मी यामध्ये योगदान दिले आहे. गेल्या 40-45 वर्षांपासून मी ह्या घरात राहत होतो. पण काही कारणास्तव नाराजीमुळे मी पक्षातून बाहेर पडलो आणि आता ती नाराज कमी झाली असल्याने मी माझ्या घरात परत येत आहे. मला वाटले की आता स्वगृही परतले पाहिजे. म्हणून मी भाजपात जात आहे.
शरद पवारांबाबत काय म्हणाले? –
शरद पवारांनी संकटकाळात साथ दिल्याने त्यांचा मी ऋणी आहे. परंतु आता पक्षांतर करताना सध्यास्थितीतील परिस्थिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहचवली आहे. आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हेही वाचा : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा; मात्र, रोहिणी खडसेंनी स्वतःची भूमिका केली स्पष्ठ