शिंदखेडा (धुळे), 4 डिसेंबर : गावाच्या विकासासाठी मिळालेल्या निधीत सुमारे 35 लाख 6 हजारांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीत घडली. याप्रकरणी तत्कालीन सरपंच इंदूबाई पुंडलिक फुलपगारे तत्कालीन ग्रामसेवकासह तिघांवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काय संपूर्ण प्रकरण? –
शिंदखेडा तालुक्याीतल साळवे ग्रामपंचायतीला गावाचा विकास करण्याकरिता 35 लाख 6 हजार 740 रूपये इतका निधी मिळालेला होता. तो निधी गावाच्या विकासावर खर्च न करता तत्कालीन महिला सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकांनी परस्पर हडप केल्याची माहिती समोर आली. हा संपूर्ण प्रकार 2 जानेवारी 2024 पूर्वी वेळोवेळी घडला.
पोलिसांत गुन्हा दाखल –
साळवे ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणी शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार तत्कालीन सरपंच इंदूबाई पुंडलिक फुलपगारे (वय 65 वर्षे), तत्कालीन ग्रामसेवक राजेश सुकलाल सुर्यवंशी (वय 52 वर्षे) (मयत), व तत्कालीन ग्रामसेवक विष्णू महाजन (वय 51 वर्षे) या तिघांवरोधात भारतीय दंड विधान कलम 409, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.