ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – इंग्रजी हा असा विषय आहे, ज्याबाबत अनेकांच्या मनात आजही भीती आहे. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण होत असल्याने काही वेळा आत्मविश्वास खचल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हालाही आता जर इंग्रजी भाषा शिकायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य विद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अशुअरन्स सेल (आय.क्यू.एस.सी.) विभागाच्या वतीने 9 डिसेंबर 2024 पासून एक महिन्यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन इंग्लिश हा वर्ग महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू करण्यात येत आहे.
या वर्गात इंग्रजीचे उच्चारण शास्त्र, व्याकरण, भाषेचे अलंकार, मुलाखत तंत्र, संभाषण कौशल्य, इंग्रजी साहित्य यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर वर्गासाठी महाविद्यालयातील तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यकक्षेतील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तसेच सदर वर्ग महाविद्यालयाच्या इमारतीत सायंकाळी 4 वाजता घेतला जाणार आहे. सदर वर्गाच्या समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वर्गासाठी 300 रुपये फी असून हा वर्ग विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, गृहिणी, तथा पालक या सर्वांसाठी खुला आहे.
या वर्गाच्या नाव नोंदणीसाठी इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा. तरी पाचोरा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा महाविद्यालयाच्या प्राचार्यातर्फे करण्यात आलेले आहे.
Breaking News : “मी, किशोर नर्मदाबाई धनसिंग पाटील….”, किशोरआप्पांनी घेतली तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ