जळगाव, 25 : चोपडा तालुक्यातील वड्री येथे मिळालेल्या माहितीनुसार, मे. अंकुर सिडस, नागपुर या कंपनीचे स्वदेशी 5 या वाणाचे बनावट बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी 23 मे, 2023 रोजी संदीप आधार पाटील, वड्री, ता. चोपडा यांचेकडून स्वदेशी 5 वाणाचे एकूण 99 हजार 750 रुपये किमतीचे 95 पाकिटे बनावट कापूस बियाणे जप्त करण्यात आले. चोपडा शहराच्या बाहेर मे. अग्रवाल पेट्रोल पंपाचे बाजूस असलेल्या हॉटेल न्यू सुनिता येथे सापळा रचून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे, जळगांव यांनी ही कारवाई केली.
याबाबत संदीप आधार पाटील, रा. वड्री, ता. चोपडा या व्यक्तीविरोधात शासनातर्फे बियाणे नियम 1968, बियाणे (नियंत्रण) आदेश 1983. महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच भा.द.वि. 1860 चे कलम 420, 465, 468 नुसार चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे क्र. 252/2023, दिनांक 24 मे, 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! स्वदेशी 5 बियाण्यांसदर्भात कृषी विभागाने दिली ‘ही’ माहिती
प्रशासनाचे आवाहन –
खरीप हंगाम 2023 मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या आणि बिना बिलाने बियाणे तसेच खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषी निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगांव यांचे मोबाईल क्र. 8983839468 व दुरध्वनी क्र.0257-2239054 वर माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.