मुंबई, 17 जानेवारी : शेतकऱ्यांना वर्षांतून तीन वेळा पीएम किसान योजनेच्या हप्ते वितरित केले जातात. अशातच पीएम किसान योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार असून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 20 हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
पीएम किसान सन्मान योजनेचा येत्या 25 जानेवारीनंतर 19 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ही अट या हप्त्याला लागू नसेल. सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील 18 वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या 96 लाख 67 हजार इतकी आहे.
पीएम किसान सन्मान योजना नेमकी काय? –
पीएम किसान सन्मान योजना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकारकडून देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत पुरवली जाते. ही मदत थेट हस्तांतरण (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केली जाते.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेची डिसेंबर 2018 पासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली. पीएम किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. अशातच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून 19 व्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे. तत्पुर्वी, पीएम किसान योजनेसाठी आता कुटुंबाचे आधार बंधनकारक करण्यात आले आहे.