जळगाव, 23 फेब्रुवारी : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाट्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले असून आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या https://mahakhanij.maharashtra. gov. in या प्रणालीवरून वाळू खरेदीची नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
वाळू बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडत. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते म्हणून राज्य सरकारने 16 फेब्रुवारी 2024 ला नवे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे आता वाळू 600 रुपये प्रती ब्रास मिळणार आहे. आता जिल्हा प्रशासनाने घरकुलासाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
▪️नव्या वाळू धोरणानुसार 600 रुपये प्रती ब्रास मिळणार वाळू
▪️जिल्ह्यात 22 वाळू डेपो होणार स्थापन
▪️या सर्व डेपोमधून 1 लक्ष 06 हजार 797 ब्रास वाळू होणार उपलब्ध
घरकुल धारकांना मोफत वाळू –
शासनाच्या धोरणानुसार दलित, आदिवासी यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार घरकुल दिले जाते. आता या घरासाठी शासनाने घेतलेल्या “ घरकुल धारकांना मोफत वाळू ” या सर्वसामान्यांचे हितासाठी हा क्रांतिकारी निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगून रमाई घरकूल, शबरी घरकुल व अन्य घरकूल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही यासंदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन आता त्या – त्या तालुक्याच्या तहसीलदार यांनी करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
घरकुलधारकांना मोफत रेती वाटप व सत्कार –
शासनाने घरकुल धारकांना ऐतिहासिक निर्णयामुळे यावेळी तालुक्यातील सौ. अनिता सैदाणे, अनिता बावस्कर यांचा साळी चोळी व बुके देवून तसेच व दिलीप केदार यांचा रुमाल व टोपी देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील, कमिशनर राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार केला व या घराकुल धारकांनाप्रत्येकी 5 ब्रॉस रेतीचे वाटप करण्यात आले.
वाळू रेतीचे साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री –
उत्खननासाठी निविदा किंवा परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून विकास कामासांठी आवश्यक वाळू उपलब्ध व्हावी, हा प्रमुख उद्देश असून नदीपात्रात वाळू साठल्याने आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्धभवू नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाने 16 फेब्रुवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये वाळू रेतीचे साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री याबाबतचे सुधारित सर्वकष धोरण नुसार निश्चित केलेले आहे.
त्यानुसार धरणगाव तालुक्यातील वाळू गटासाठी मौजे धरणगाव येथील वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी उदघाटन झाले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाळूडेपोतून ज्या ग्राहकांना वाळू हवी त्यानी महाखनिज प्रणालीच्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ग्राहकांना सेतु केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल. या नोंदणी वाळूडेपोतून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल याची नोंद घ्यावी, वाळू आवश्यक असलेल्या ग्राहकांनी महाखनिज (Mahakhanij) या वेबसाईटवर मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.
अशी असणार वाळू उपलब्धता –
नांदेड येथील गट नंबर 1119 मध्ये वाळू गट क्र. 12 व 13 साठी 5247 ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. आता जिल्ह्यात 29 वाळू गटांसाठी 22 वाळू डेपो स्थापन होणार असून या वाळू डेपोमधून एकूण 1 लक्ष 06 हजार 797 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. ही वाळू
विकताना ग्राहकांसाठी ना नफा – ना तोटा या तत्वाचा अवलंब होणार आहे.वाळूची नोंदणी केल्यावर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे.
यांची होती उपस्थिती –
तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन झाले यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा खानिकर्म अधिकारी रविंद्र उगले, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते, गटनेते पप्पू भावे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिले ‘तुतारीवाला माणूस’ नवे चिन्ह