ठाणे, 16 जुलै : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. दरम्यान, या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून वारकरी तहान भूक हरपून विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीच्या दिशेने पायी निघतात. अशातच राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुराच्या दिशेने जात आहेत. डोंबिवलीवरुन निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. विठ्ठलाच्या ओढीने सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात –
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन पंढरपूच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. दरम्यान, ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ती ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली.
5 जणांचा दुर्दैवी मृत्यू –
ट्रॅव्हल्स खड्डयात पडल्यामुळे ट्रॅव्हल्समध्ये असलेले 54 वारकऱ्यांपैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आता सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत