नवी दिल्ली, 23 जानेवारी : भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न –
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. कर्पूरी ठाकुर यांनी मागासलेल्या लोकांच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते. कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कर्पूरी ठाकुर यांचा परिचय –
कर्पूरी ठाकुर बिहारचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. 1952 साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी 1988 सालापर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरी कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते.
कर्पुरी ठाकुर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांना आदर्श असे व्यक्तिमत्व मानले जाते. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे देशभर ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे.
दरम्यान, बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्र सरकारने कर्पूरी ठाकुर यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, आमचा ‘भाजपमुक्त’ श्रीरामचा नारा! तर मुख्यमंत्र्यांचाही यावर पलटवार