मुंबई, 20 डिसेंबर : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या तसेच राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे वृधापकाळाने निधन झाले. 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शालिनीताई यांनी आपल्या पती वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शालिनीताई पाटील यांचा थोडक्यात परिचय –
वसंतदादा पाटील यांच्याशी विवाहानंतर शालिनीताई पाटील या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1980च्या दशकात काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या राजीनाम्याच्या घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
शालिनीताई यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या कालावधीत त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. यापूर्वी 1990 मध्ये जनता दलाकडून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती; मात्र त्या वेळी त्यांना यश मिळाले नव्हते.
हेही वाचा : प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता






