पुणे, 24 जुलै : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे मोक्का कोर्टात सीबीआयने धक्कादायक अहवाल सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असतानाच प्रकरण तापले होते. आता तर तत्कालीन एसपी यांना देखमुखांनी धमकावल्याचा आरोप देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे.
जळगावचे तत्कालीन एसपी डॉ. प्रविण मुंढे यांची कबुली –
जळगावच्या एका शिक्षण संस्थेच्या ताब्याच्या वादाच्या प्रकरणात विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. दरम्यान, याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांनी धमकी दिल्याची कबुली जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढेंनी सीबीआयकडे कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया –
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की, भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या, असे आदेश अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना दिले होते. पण हा गुन्हा जळगावच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा, अशी भूमिका प्रवीण मुंडेंनी घेतली. परंतु, गृहमंत्री अनिल देशमुखांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे.
View this post on Instagram
गृहमंत्री फडणवीस यांचा देशमुख यांच्यावर गंभीर आरोप –
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन एसपींवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. सीबीआयने जी चार्जशिट दाखल केलीय, त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे की गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करा असे म्हटले आहे. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिले असल्याचा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? –
जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर भाजपचे गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरुन वाद सुरू झाला होता. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणात गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा एसपी मुंढे यांनी सीबीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, पिक विमाधारकांसाठी 523 कोटीच्या निधीस मान्यता