चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 27 मे : शेतकऱ्यांना एकीकडे कर्ज भेटत नाही. बियाणांसाठी व्याजाने पैसे आणावे लागत आहेत. दुष्काळसदृश्य तालुक्यांमध्ये जीआरची अंमलबजावणी होत नाहीये. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलाय. यांसारख्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असताना देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, आणि कृषीप्रधान देश म्हटला जातो, अशी टीका माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मोदी सरकारवर केली. उन्मेश पाटील यांच्या पत्रकार परिषदेचे आज जळगावात आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले उन्मेश पाटील? –
उन्मेश पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ही पाच टप्प्यात घेऊन दुर्दैवाने खान्देश-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होरपळण्याचे पाप हे ह्या सरकारने केले. आचारसंहिता शिथिल करून राज्यातील समस्या सोडवण्याची प्रयत्नांची गरज असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करतायेत. जिल्ह्यात उष्माघाताचे बळी वाढत असताना प्रशासन कुठेलेही पाऊले उचलताना दिसत नाहीत. उष्माघातापासून बळी जाऊ नये, यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या पाहिजे होत्या, याविषयी काहीही केले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांकडून वसुली सुरू –
दुष्काळसदृश्य तालुक्यात वसुली थांबवून कर्जाचे पुनर्गठन करण्याचा आदेश असतानाही शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. जिल्हा बँकेककडून 15 एप्रिलपर्यंत कर्ज वाटप व्हायला पाहिजे होते. मात्र, आज एक महिन्याहून जास्त वेळ झाला असताना देखील शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नसल्याचे उन्मेश पाटील यांनी सांगितले. एकीकडे विहिरीसाठी शेतकरी लाखो रूपयाचे कर्ज काढतो तर दुसरीकडे शेततळ्यासाठी जीआरमध्ये योग्य त्या तरतूदी असताना देखील शेतकऱ्यांना या योजनापासून वंचित रहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे मदत व पुनवर्वसन मंत्री असताना देखील शेतकऱ्यांना मदत तर सोडा त्यांचे पुनर्वसन देखील होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
‘तुम्ही शेतकऱ्यांवर बंधन आणताय!’ –
बियाण्यांच्या विक्रीवर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना जे हवे ते बियाणे मिळत नाहीये. दुसऱ्याच कंपनीचे बियाण घेण्यासाठी सांगितले जात आहे. म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी हवे त्याठिसाठी तुम्ही आवडीच्या हॉटेलमध्ये जातात. आवडीचे कपडे घालतात. मात्र, शेतकऱ्यांना जे बियाणे हवे ते तुम्ही त्यांना देत नाहीयेत. तसेच सत्ताधारी शेतकऱ्यांवर बंधन आणत असल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला. जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही शेतकऱ्यांसाठी का मदत मिळत नाहीये, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अन्यथा आंदोलन उभे करू –
तोक्ते चक्रीवादळ आल्यानंतर प्रशासनाकडून सरकरला 15000 कोटी रूपयांचा आराखडा पाठवण्यात आला होता. यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी म्हणून 5,000 कोटी रूपयांची मदत जाहीर झाली. मात्र, 24 महिन्यात 50 कोटी देखील रूपये खर्च केले गेले नाही, असाही आरोप उन्मेश पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत न मिळाल्यास महाविकास आघाडी म्हणून आम्ही आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांना दिला.
हेही वाचा : खान्देशात भाजप किती जागा जिंकणार? मंत्री गिरीश महाजन यांनी केला मोठा दावा, काय आहे संपूर्ण बातमी?