लासगाव (पाचोरा), 1 नोव्हेंबर : पाचोरा तालुक्यातील लासगाव शिवारात म्हैस चोरीची घटना घडली असून प्रेमराज आनंदा पाटील यांचे चिरंजीव सुधाकर प्रेमराज पाटील (रा. लासगाव) यांच्या शेतातून चार म्हैस तसेच दोन पारडू अज्ञातांनी चोरल्याचे प्रकरण 31 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, म्हैस चोरीमुळे मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्याने सखोल तपासाची मागणी केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर प्रेमराज पाटील यांच्या शेतातील (गट क्र. 342) शेडमधून चार म्हैस आणि दोन पारडू अशी एकूण सहा जनावरे अज्ञात चोरट्यांनी 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरून नेली. सकाळी 31 ऑक्टोबर रोजी चारापाणी करण्यासाठी गेल्यानंतर गुरे शेडमध्ये आढळली नाहीत. त्यानंतर, सुधाकर पाटील यांनी नातेवाईक तसेच मित्रांसह परिसरात शोध घेतला. मात्र, गुरांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर, गुरे चोरीला गेल्याची खात्री पटल्याने त्यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल केली.
सखोल तपासाची शेतकऱ्याची मागणी –
शेतकरी सुधाकर प्रेमराज पाटील हे शेतीबरोबरच म्हशींच्या दुधाच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आता चार म्हशी चोरी गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. एका रात्रीत झालेल्या या चोरीमुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पोलिसांनी सखोल तपास करून चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी शेतकरी सुधाकर पाटील यांनी केली आहे.
पीआय राहुलकुमार पवार काय म्हणाले? –
पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी म्हैस चोरीच्या घटनेची तात्काळ दखल घेत 31 ऑक्टोबर रोजी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. ‘म्हैस चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपास सुरू आहे,’ अशी माहिती त्यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली. लासगाव ते बांबरुड मार्गावरील शेतातील शेडची तार कापून चोरट्यांनी प्रवेश केला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
आत इतर गुरे शेडमध्ये असतानाच चार म्हशी आणि दोन बच्चे चोरीस गेल्याचे पवार यांनी सांगितले. घटनेच्या ठिकाणी गाडीने म्हशी नेल्याचे काही ठसेही दिसून आले असून, त्याआधारे पोलिसांकडून सखोल व तांत्रिक तपास, तसेच फोन टॅपिंगची कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी दिली.






