चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 23 जून : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण? –
महाविकास आघाडीच्या वतीने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्र चा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकण्याची भाषा केली.
जोर्वेकर धमकी देताना काय म्हणाले? –
किसन जार्वेकर आपल्या भाषणात धमकी देताना म्हणाले की, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी त्यांना संपवून टाकेल. माझे वय 73 वर्षे आहे. मला कॅन्सर-डायबिटीस आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी घालून टाकेल, अशी धमकी किसन जार्वेकर यांनी भर सभेत उपस्थितांना संबोधीत करताना दिली होती.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –
मंगेश चव्हाण यांना धमकी दिल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आमदारांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारून टाकेल यापेक्षा गंभीर घटना कोणती असू शकत नाही. त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. व्यासपीठावर बसून अशा स्वरूपाची धमकी देणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. मंगेश चव्हाण हे सध्या माझ्यासोबत असून या संदर्भात ते तक्रार देणार आहे.
तसेच मी या धमकी प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.