जळगाव, 28 जुलै : देशातील प्रसिद्ध वकील, जळगावचे सुपूत्र, पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच काल 27 जुलै रोजी जळगाव येथे आले. यानिमित्ताने काल सायंकाळी जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा करण्यात आला.
पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न –
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान, या निवडीनंतर जळगावमध्ये अॅड. उज्ज्वल निकम यांचा नागरी सरकार करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रा. डॉ. एन.के. ठाकरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
View this post on Instagram
यावेळी तीन रंगी सुती हार, शाल, मानपत्र, स्मृतिशिल्प तसेच संपुर्ण जळगावकरांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मूर्ती देऊन निकम यांचा सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.
यावेळी जळगावचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, गुलाबराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभू पाटील, हर्षल पाटील यांनी केले. तर डॉ. सोनाली महाजन यांनी आभार मानले.
लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव –
मागील वर्षी 2024 लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट कापून अॅड. उज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचे आव्हान होते. दरम्यान, या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.
…अन् थेट आता राज्यसभेवर निवड –
लोकसभा निवडणुकीच्या पराभवनंतर उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासोबतच बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. यानुसार त्यांनी राज्यसभेत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. या शपथेनंतर जळगावात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : “अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले