बटुमी : नागपूरच्या दिव्या देशमुख या 19 वर्षीय मराठमोळ्या तरुणीने इतिहास रचला आहे. दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी इथं खेळल्या गेलेल्या 2025 च्या FIDE बुद्धिबळ विश्वचषकात अखेर विश्वचषक विजेतेपद जिंकलं. या स्पर्धेत तिच्यासमोर आपल्याच देशाच्या कोनेरु हम्पीचे आव्हान होते. हे आव्हान स्विकारत तिने कोनेरू हम्पीचा पराभव केला.
सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमधील क्लासिकल सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी झालेल्या क्लासिकल सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीनं नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. त्यामुळे क्लासिकल सामना 1-1 गुणांनी बरोबरीत सुटला होता.
यानंतर सोमवारी खेळवण्यात आलेल्या रॅपिड राउंडमध्ये, जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखनं पांढऱ्या तुकड्यांसह सुरुवात केली. यावेळी ती आक्रमकही दिसली. पण जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर असलेल्या हम्पीनं काळ्या तुकड्यांसह खेळत सामना बरोबरीत सोडवला आणि मानसिक फायदा मिळवला. यानंतर रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या तुकड्यांसह खेळताना, दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. यामध्ये सुरुवातीला कोनेरूसाठी वेळेचं व्यवस्थापन थोडं कठीण वाटत होतं आणि तिनं रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्येही चूक केली, असं तज्ञ म्हणाले.
कोण आहे दिव्या देशमुख –
दिव्या देशमुख या तरुणीचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी नागपूर इथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षी तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉक्टर आहेत. दिव्याने 2012 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी अंडर-7 राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर तिने अंडर-10 (डरबन, 2014) आणि अंडर-12 (ब्राझील, 2017) प्रकारात जागतिक युवा जेतेपदे जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये डरबन येथे झालेल्या अंडर-10 वर्ल्ड युथ टायटल आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-12 कॅटेगरीचे टायटलही तिने जिंकले. तिच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे ती 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर बनली. अशी कामगिरी करणारी दिव्या देशमुख ही विदर्भातील पहिली आणि देशातील 22 वी महिला खेळाडू बनली.
टायब्रेकरमध्ये सामना कसा खेळतात? –
टायब्रेकरमध्ये प्रत्येकी 15 मिनिटांचे दोन खेळ असतात आणि प्रत्येक चालीनंतर 10 सेकंद जोडले जातात. यानंतर जर गुणसंख्या समान राहिली तर दोन्ही खेळाडूंना प्रति गेम 10-10 मिनिटे यानुसार दुसरा सेट खेळण्याची संधी मिळते. यामध्ये देखील प्रत्येक हालचालीनंतर 10 सेकंदांची वाढ होते.
सेमी फायनलमध्ये चीनच्या खेळाडूचा केला पराभव –
19 वर्षीय नागपूरकर आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने सेमी फायनलमध्ये चीनच्या टॅन झोंगी हिचा 1.5-0.5 असा पराभव केला. त्याआधी क्वार्टर फायनलमध्ये, दिव्यानं ग्रँडमास्टर जीएम हरिका द्रोणवल्ली हिला पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांचे दोन्ही क्लासिकल सामने अनिर्णित राहिले होते. मात्र, दिव्यानं टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. तर प्री-क्वार्टर फायनलमध्ये दिव्याने झू जिनरला 2.5-1.5 अशी मात दिली होती.