जळगाव, 8 फेब्रुवारी : राज्यभरात राज्यसभा-लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच जळगावात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर थेट विरोधकांना ओपन चॅलेंज केले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बीलवाडी या गावात विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात जोरदार भाषण करत विरोधकांना ओपन चॅलेंज केले. आपल्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा जर कोटीच्या खाली काम निघाले तर राजकारणातून संन्यास घेईल. विरोधकांपेक्षा कणभर काम जरी जास्त केलेले नसेल तर आमदारकीसाठी फॉर्म भरणार नाही, असे ते म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गरीबी मी जवळून पाहिली आहे. सोन्याचा चमचा घेवून मी जन्माला आलो नाही. मी सर्व साधारण माणूस असून याला जेलमध्ये टाका, याला त्रास द्या हा धंदा मी आयुष्यभर केलेला नाही. नुसत मत मागायचे अन् काम करायचं नाही, बोंब पडायची नाही आणि नुसती टीका करायची’, अशी टीका त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव न घेता केली.
दहा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन –
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांच्या जळगाव ग्रामीण या मतदारसंघातील बीलवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बिलवाडी गावातील रस्ते जलकुंभ स्मशानभूमीसह दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा : ‘राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे,’ रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?