नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये हरियाणा राज्यात भाजपला तिसऱ्यांदा सत्ता हातात ठेवण्यात यश आले असून हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपची विजयाची हॅट्रीक झालीय. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 49 जागा जिंकल्या असून त्याठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हरियाणात भाजपची हॅट्रीक –
हरियाणा विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असून जवळपास 49 जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 असा हा आकडा गाठलाय. तर दुसरीकडे काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानाव लागलंय. हरियाणामधील विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान, शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचे बोलले जात होते. तसेच सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपने घवघवीत यश मिळवत हॅट्रीक मारलीय.
जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता –
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यान, या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली आहे. 2014 साली अवघ्या 15 जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सने यावेळी तब्बल 42 जागांपर्यंत मजल मारलीय. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 49 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, आता जम्मू -काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ठ झाले आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महा मुंबई मेट्रोच्या MD Rubal Agarwal यांची विशेष मुलाखत