जळगाव, 10 जुलै : राज्यातील विविध भागात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलीय. तर काल विदर्भाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने नागपुरसह विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तर काही गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून आज विदर्भासह, कोकण आणि घाट विभागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सर्तकतेचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार –
यंदा महाराष्ट्रातील विविध भागात आतापर्यंत जोरदार पाऊस झालाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असताना राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्याठिकाणी आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी –
मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विजांचा कडकडाट सुरु असताना आकाशात वीज पडताना शेतात किंवा झाडाखाली थांबू नये. तसेच नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे. डोंगराळ व पुरग्रस्त भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात आठवड्याच्या सुरूवातीलाच विविध भागात समाधानकारक पाऊस झालाय. यामुळे शेतीकामांना देखील वेग आलाय. तर दुसरीकडे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ होण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याचे वातावरण हे साधारणपणे ढगाळ राहणार असून अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.






