जळगाव, 3 ऑगस्ट : राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे सातपुड्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झालाय. दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून आज आणि उद्या जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार ते अतीजोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, जोरदार पावसासोबतच 40 ते 50 किमी वेगाने वारेदेखील वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
हेही वाचा : …..तर पीक विम्यापासून वंचित रहावे लागणार?, जळगाव जिल्हा प्रशासनाचे नेमकं काय आवाहन?