चंद्रकात दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 ऑगस्ट : गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले असून मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या जळगाव दौऱ्यादरम्यान, महत्त्वाचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या 5 तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जळगाव येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास असून, प्रत्येक क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सातत्यानं कार्यरत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
View this post on Instagram
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत जळगाव जिल्हा सिंचन धोरण, खरीप हंगामाची तयारी, तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना, शेततळे योजना, विभागीय क्रीडा संकुल उभारणी, गंगाखेड बेट पर्यटनासह विभागातील पर्यटन विकास, जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व रेल्वे एकत्रीकरण, MIDC औद्योगिक विकास, बँकिंग पतपेढी आराखडा यांसह जिल्ह्यातील प्रलंबित व सुरु असलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, यावेळी जळगाव जिल्हा नियोजन समिती कार्यालय अधिलेख कक्षाचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार –
माध्यमांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जळगावमध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. 5 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. यामध्ये अनेक पंचनामे हे आजच त्याठिकाणी सुरू होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शहीद जवानांच्या स्मारकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात 29 ठिकाणी शहीद स्मारक उभारण्याची मागणी आहे. ही मागणी मान्य करण्यात आली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, जिल्हा नियोजन समिती सभागृहातील या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.