चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अधिवेशाला आता दोनच दिवस बाकी राहिले आहेत. यामध्ये आज गुरूवारी विधानसभेत बोलताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या संपाबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला विचारणा केली.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
विधानसभेत बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आपल्याकडे काल परवापासून राज्यभरातील डॉक्टर बीएचएमस डॉक्टर्स आंदोलन करत आहेत. 2014 मध्ये आपण कायदा तयार केला. आपण त्यांच्यासाठी कोर्स दिला. कोर्स देऊन रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिली. अचानक त्यांना ते रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलं.
एका बाजूला बोगस डॉक्टर्स दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला कारवाया होत आहेत. तिसऱ्या बाजूला ग्रामीण भागात डॉक्टर्स मिळत नाहीत आणि चौथ्या बाजुला आपण त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करुन लाखो डॉक्टरांवर आपण घाला आणत आहोत.
त्यामुळे बीएचएमएस डॉक्टरांच्या संदर्भात जे धोरण आपण आणलं आहे. त्याच्यावर जी आपण स्थगिती दिला आहे, ती स्थगिती उठवून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना आपण न्याय देणार का, असा सवाल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकारला केला.
आमदार किशोर आप्पा यांच्या या मुद्द्यावर बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मियालाल मुश्रीफ म्हणाले की, हा प्रश्न अधिपरिचारिकेच्या भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत होता. तर आमदार किशोर आप्पा यांनी कालच्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या संपाबाबत प्रश्न उपस्थित केला. पण त्यांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये आपण कायदा केला. सीसीएमपी ही पदवी जर एक वर्षाची घेतली तर होमिओपॅथी डॉक्टरला एलोपथीचीही प्रॅक्टीस करता येईल. काही प्रमाणात अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन द्यावं, असं आमचं ठरलं. परंतु एलोपथीची जी मार्ट, आएमए वगैरे अशा संघटनांनी यावर आक्षेप घेतला. मुळात उच्च न्यायालयात ही केस सुरू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी दोन्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत चर्चा केली आहे. आता हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहिला आहे. त्यामुळे आपण ॲडव्होकेट जनरल यांना याबाबतचं मत विचारुन पुढचा निर्णय घेणार आहोत. काल होमिओपॅथीच्या ज्या डॉक्टरांनी संप उठवलेला आहे आणि लवकरात लवकर याबाबतचा तोडगा आपण काढू, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.