ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 14 जानेवारी : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत असताना पाचोरा येथील ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष मोहन भिका चौधरी यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुका पदाधिकाऱ्यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
तहसिलदारांना निवेदन –
संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देत वाहनचालकांसोबत संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. दरम्यान, शशिकांत दुसाने यांनी पदाधिकाऱ्यांसह पाचोरा तालुक्याचे तहसिलदार संभाजी पाटील यांना निवेदन दिले. ट्रकचालकांच्या मागणीला पाठिंबा देत चालकांची मागणी पूर्ण व्हावी तसेच त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यांची होती उपस्थिती –
यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष विलास पाटील, पाचोरा तालुका सचिव इंद्रनील पाटील, पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी ईसा तडवी, पाचोरा तालुका महिलाध्यक्षा मंदाकिनीताई पाटील, पाचोरा तालुका महिला संघटक सुष्माताई पाटील, महिला उपसंघटक ललिताताई पाटील यांच्यासोबत बांबरूड (महादेवाचे) निळकंठ पाटील, बळीराम पाटील, हेमराज पाटील, तसेच वाहनचालक उपस्थित होते.
काय आहे हा नवीन कायदा? –
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. दरम्यान, या कायद्याविरोधात देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे.
हेही वाचा : मोटार वाहन कायद्याला विरोध; नेमका काय आहे नवा ‘हिट अँड रन’ कायदा?