चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही जगभरातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. मात्र, अगदी मोजकेच त्यात उत्तीर्ण होतात. यापैकीच एक म्हणजे आयएएस अधिकारी मीनल करनवाल. त्यांना सलग दोन वेळा पूर्व परिक्षेतच अपयश मिळाले होते. मात्र, त्यांनी हार न मानता पुन्हा एकदा जिद्दीने प्रयत्न केले आणि आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 2019 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससीत यश मिळवले आणि देशभरात 35 वी रँक मिळवत त्या आयएएस झाल्या.
मिनल करनवाल या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत नंदुरबार, नांदेड याठिकाणी सेवा बजावली असून त्यांनी नुकताच जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यानिमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपला आतापर्यंतचा प्रवास तसेच आगामी काळातील जळगाव जिल्ह्याच्या विकासाबाबत महत्त्वाचे भाष्य केले.
प्रश्न : मॅम, आपण यापूर्वी नांदेड, नंदुरबार याठिकाणी सेवा बजावली आहे. याबद्दल काय सांगाल?
उत्तर – तीनही जिल्हे फार वेगळे आहेत. नंदुरबार आदिवासी जिल्हा असल्याने तिथल्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. नांदेड मराठवाड्यातील जिल्हा असल्याने तिथल्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. जसे की, पाणी. आणि जळगाव हा एक वेगळा जिल्हा असल्याने येथील प्राथमिकता वेगळ्या आहेत. महाराष्ट्र हे मोठं राज्य असल्याने तीनही जिल्हे वेगळे आहेत. तेथील प्राथमिकता वेगळ्या आहेत. या प्राथमिकता ओळखून पुढे जाणार आहे.
प्रश्न : वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससीमध्ये भारतभरातून 35 वी रँक मिळवली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत तुम्ही दाखल झाल्या. स्पर्धा परीक्षा करण्यापासूनचा तो कालावधी ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता?
उत्तर – तो प्रवास खरंतर आव्हानात्मक होता. कारण यूपीएससी देणं ही सोपी गोष्ट नाही. पण अशक्य आहे असंही नाही. शक्य आहे फक्त हार्ड वर्क आणि diligence. इंटेलिजन्स पेक्षा जर तुम्ही हार्कवर्किंग राहिले, मेहनती राहिले, नियमित अभ्यास केला तर यूपीएससी करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त मॅरेथॉनसारखी आहे. 100 किंवा 200 मीटरची धावण्याच्या स्पर्धेसारखी नाही, ही दीड ते दोन वर्षाची मॅरेथॉन आहे. जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा वाटत होतं की आपण कॉलेज आणि स्कूलमध्ये अभ्यासात पहिला क्रमांक मिळवलाय, त्यामुळे हे सोप्पं जाईल. पण तसं खरोखर नव्हतं. दोन वेळा पूर्व परिक्षेत नापास झाल्यावर थोडासा धक्का लागला. कारण आयुष्यात मी नापास कधीही झाले नव्हते. पण धक्का लागल्याने कुठे कुठे सुधारणा करायची, ती सुधारणा केली आणि तिसऱ्या प्रयत्नात मी आयएएस झाली. जी मुले ऐकत असतील, त्यांना असं वाटत असेल की, खूप अवघड आहे. चॅलेंजिंग आहे. पण करण्यासारखी गोष्ट आहे. हे मी परत एकदा सांगू इच्छिते.
प्रश्न : ज्यावेळी तुम्ही तयारी करत होत्या, त्यावेळचा एखादा क्षण अनुभव शेअर कराल.
उत्तर – मी जेव्हा दुसऱ्यांदा पूर्व परिक्षेत नापास झाली होती, 17 सप्टेंबर 2017 ला तो दिवस आजही आठवतो. कारण दुसऱ्यांदा पूर्व परिक्षेत नापास होणं म्हणजे आई-बाबा हे विचारतात की, तुम्ही दिल्लीला काय करत आहात, जर तुम्ही दुसऱ्यांदा पूर्व परिक्षेत नापास होत आहात. पण तोच दिवस होता जेव्हा मी मनात ठरवलं होतं की, आता बस्स झालं. आता मेहनत चांगली, व्यवस्थित करायची नाहीतर असंच आपण फिरत राहू.
प्रश्न : नंदुरबार, नांदेड याठिकाणी तुम्ही वेगवेगळे प्रयोग राबवले. या प्रकल्पांमागची प्रेरणा, संकल्पना काय असते?, कशा पद्धतीने तुम्ही त्यावर काम करतात?
उत्तर – प्रोजेक्ट वेध असो किंवा आम्ही आरोग्याबाबतही आयआयटी मुंबईसोबत नांदेड आणि नंदुरबारला काम केलंय. नांदेडला बालिका पंचायतही केली आहे. नेहमी विचाराचा केंद्र असतो की, आमची मुले, लाभार्थी हे कुठल्याही उपक्रमाचे केंद्र राहिले पाहिजे. सामान्यत: आपण पाहतो की, एखादी योजना वरुन आली की, कधी कधी खाली लोकांना कळतही नाही. किंवा कर्मचाऱ्यांनाही कळत नाही की, या योजनेचे मूळ काय. त्यांना वेळ लागतो. पण प्रोजेक्ट वेध, बालिका पंचायत, आरोग्यबद्दलही इतर अनेक प्रोजक्ट्स केले, यामध्ये माझा असा उद्देश्य होता की, आमचा जो कर्मचारी वर्ग आहे, तो खरोखर मेहनती असतो. पण त्यांना बरोबर मार्ग दाखवला, ज्यांना आपण टेक्निक म्हणतो, जी वर्गात शिकवायची पद्धत असेल किंवा आरोग्यात स्तनपानाची पद्धत असेल ही टेक्निक जर बरोबर शिकवली, तर त्यांना परिणाम आणि यश दोन्ही दुप्पट मिळू शकते. माझा नेहमीच हाच विचार राहिला आहे.
प्रश्न : नांदेडमध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झालात. तिथला अनुभव कसा होता? तिथल्या आठवणी काय आहेत?
उत्तर – नांदेडमध्ये मी 2023 मध्ये जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी झाली आणि तिथे जो माझा 1 महिने आणि 8 महिन्यांचा कार्यकाळ राहिला तो फार समाधानकारक राहिला. कारण नांदेड मराठवाड्यात असून तेथील आव्हाने फार वेगळी आहेत. जसे की, पाण्याचा विषय होता. तिथे आम्ही 50 टक्के योजना कार्यान्वित करुन पाणीपुरवठा सुरू करायला लावला. पुरुष सरपंचही पुढे येऊन त्यांनी बालिका पंचायतमध्ये काम केलं. जे व्हिजिटर्स जिल्हा परिषदेत भेटायला येतात, त्यांच्या तक्रारींचं वेळेवर निवारण करण्यासाठी कालबद्ध प्रणाली विकसित केली होती. जसे की तुम्ही म्हणालात की, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे. खूप लोकं येतात. विभागही खूप आहेत. कर्मचारी मेहनतही खूप करतात. पण लोकं आले आणि त्याची नोंद कुठेतरी घेतली, त्यांच्या समस्येचं वेळेवर निराकरण झालं, याच्यावर तिथे काम केलं आणि इथेही काम करण्यास इच्छुक आहे.
प्रश्न : जळगावमध्ये आल्यानंतर तुम्ही विविध विभागांचा आढावा घेतलेला आहे. काम करण्यासाठी कशा पद्धतीने प्राधान्यक्रम असेल? कोणत्या नेमक्या संकल्पना राबवणार?
उत्तर – माझ्या मनात दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे नांदेडला जे केलं ते तर मी इथे करणारच आहे, कारण ग्रामीण भाग सारखा असतो. शिक्षण, आरोग्य, बालिका पंचायत यावर मी काम करणारच आहे. पण मला स्वच्छतेवर काम करायला खूप आवडते. ते तिथे करू कले नाही, त्यामुळे इथे करायची इच्छा आहे. दुसरं असं की, आपल्या बचत गटांच्या महिलांसाठी रुरल मार्ट. माझ्या मनात इच्छा होती की, या महिलांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी स्वतंत्र जागा असली पाहिजे. म्हणून मी त्यात काम करण्यास इच्छुक आहे.
प्रश्न : तुम्ही मुळच्या उत्तराखंडच्या असल्याने पण तुम्ही ज्या पद्धतीने मराठी बोलतात. त्यामुळे तुमचं कौतुकंही केलं जातं. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकण्यासाठी काय आव्हान होतं?
उत्तर – महाराष्ट्राला माझे पहिले प्राधान्य होतं, कारण मला मुंबई खूप आवडते आणि आमचं करिअर जर पाहिलं तर 60 टक्के वेळ ही हेडक्वार्टरला म्हणजे राजधानीला जाते. मग मला असं वाटलं की, मुंबईपेक्षा चांगली राजधानी माझ्यासाठी दुसरी कुठली नाही. म्हणून मी महाराष्ट्र हा पहिला पर्याय दिला. माझी रँक चांगली आली त्यामुळे महाराष्ट्र मिळालं. इथे मला वेळोवेळी माझे सिनिअर्स किंवा यशदा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सांगितले गेले की, मराठी आधी शिकली पाहिजे आणि मग तुम्ही काम शिका. म्हणजे त्याचा सांगायचा अर्थ असा की, लोकांशी जे कनेक्ट आहे, ते त्यांच्या भाषेत बोलण्यावरच होतो म्हणून मराठी शिकली आणि मला आता छान वाटतंय की, तुमच्यासारखे किंवा मला बाकी पण महाराष्ट्राचे लोक भेटतात, तर ते सांगतात की, तुमची मराठी चांगली आहे. पण अजून सुधरायची आहे.
प्रश्न : नागरिक हे समस्या घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जातात, तक्रार अर्ज किंवा विनंती अर्ज देतात पण वेळेत त्याचं तक्रार निवारण होत नाही. याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार?, संबंधित अधिकाऱ्यांना काय सूचना देणार?
उत्तर – मी नांदेडला असताना टाईम बाऊंड व्हिजिटर्स रेफरन्स केली होती, यामध्ये मी स्वत: व्हिजिटर्सच्या आलेल्या तक्रारीवर एक तारीख लिहिणार की संबंधित विभागप्रमुखाने त्या तक्रारींचं निवारण किंवा त्या तक्रारींची आज रोजी काय स्थिती आहे, ते दोन ओळीत कळवायचे. तर इथेही मी त्याला सुरू करणार आहे की समजा तक्रारदाराची फाईल होऊ शकत नाही, तेही कळवणे गरजेचे आहे. तक्रारदाराची फाईल होऊ शकते तर किती वेळात होईल, तेही कळवणे गरजेचे आहे आणि नियमित वेळेत कळवणे ते गरजेचे आहे. म्हणून मी इथे टाईम बाऊंड व्हिजिटर्स रेफरन्स येथे राबवणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे.
प्रश्न : तुम्ही वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससीमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आणि आयएएस झालात. तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. तरुण-तरुणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
उत्तर – मी नेहमी म्हणते की, दोन गोष्टी आमच्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे स्वप्न पाहा. आपले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जे म्हटलं होतं की, स्वप्न नेहमी मोठं पाहायचं. मी काही वेळा शेतकऱ्यांच्या मुलांना भेटली, तर ते म्हणतात नाही मॅडम यूपीएससी खूप मोठं झालं. एमपीएससी करू. पण माझ्या मनात एक गोष्ट येतं की, तुम्ही एमपीएससीचा विचार केल्यावर तुमचं रेल्वे निघेल. तुम्ही यूपीएससीचा विचार केल्यावर एमसीएससी निघू शकते. स्वप्न नेहमी मोठं ठेवायचे आणि त्याला जर तुम्ही मनात ठरवले की, हे मी पूर्ण करणारच, तर तुम्हाला जगातली कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही हा माझा स्वत:चा विश्वास आहे. आणि दुसरं मला ग्रामीण क्षेत्रातील मुलांच्या मनात एक भीती नेहमी दिसते की, आम्ही इंग्रजीत बोलू शकत नाही किंवा आम्ही कुठल्या मोठ्या शहरात राहिले नाही किंवा आमचे आई-वडील श्रीमंत नाही, ते सामान्य शेतकरी आहेत. पण मला एक वाटते की, आपण भारतातील साधारणत: 20 व्यक्तिमत्त्वे पाहिले आणि जगातीलही अनेक लोक फार मध्यम वर्ग आणि कनिष्ट मध्यम वर्गातून आलेले आहेत. गरीबीतूनही लोकं खूप चांगल्या पदांवर गेलेले आहेत. भिती नाही मला शक्ती पाहिजे, ही गोष्ट जर तुम्ही मनात ठेवली तर तुम्ही जगातील कुठलीही गोष्ट करू शकता.