जळगाव, 3 सप्टेंबर : राज्यभरातील विविध भागात 1 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस झालाय. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. परिणामी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
खान्देशात पावसाचा जोर कायम –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच खान्देश, विदर्भ, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट –
हवामान विभागाने आज राज्यातील जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम तसेच यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला. आज या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस होतोय. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यांमध्ये वाढ –
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गिरणा धरणातील 02 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 2,442 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून 99,941 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान, नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आपतकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.