मुंबई, 15 एप्रिल : भारतीय हवामान विभागाने आज 15 एप्रिल रोजी दुपारी यावर्षी देशात मान्सूनची स्थिती कशी असेल? याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत या वर्षाचा पावसाचा अंदाज देण्यात आला असून यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 105 टक्के पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मान्सून वेळेवर सुरू होईल, म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमधून प्रवेश करेल, असेही आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
नेमका किती पाऊस पडणार? –
भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 105 टक्के पडेल. तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. यासोबतच महाराष्ट्रात पुरेसा पावसाच्या सरी कोसळतील. दरम्यान, मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
या वर्षी पडणार 105 टक्के पाऊस –
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या मान्सून पावसाबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात गेल्या पाच दशकांपासून दर वर्षी सरासरी 87 सेमी पाऊस पडत असून यामध्ये यंदा पाच टक्क्यांची वाढ होईल. हा फक्त पहिला अंदाज असून आयएमडीचा पुढील अंदाज मे मध्ये प्रसिद्ध होईल, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.