जळगाव : ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी संस्थेकडून किंवा बँकेच्या थेट फायनान्सकडून एप्रिल 2024 ला कर्ज घेतलेले आहे, त्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2025 च्या आत जर कर्ज भरलं तर त्यांना जिल्हा बँकेने शून्य टक्के व्याज लावावं, म्हणजे शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जावर फक्त मुद्दल भरावं, व्याज भरू नये, असा निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केली. काल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय पवार यांनी काय माहिती दिली?
पत्रकार परिषदेत बोलताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये काहीतरी गोंधळ होत आहे. व्याज भरावं की नाही भरावं, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. परंतु जळगाव जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या सभेत असा निर्णय झालेला आहे की, ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी संस्थेकडून किंवा बँकेच्या थेट फायनान्सकडून एप्रिल 2024 ला कर्ज घेतलेले आहे, त्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2025 च्या आत जर कर्ज भरलं तर त्यांना जिल्हा बँकेने शून्य टक्के व्याज लावावं, म्हणजे शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जावर फक्त मुद्दल भरावं, व्याज भरू नये, असा निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे.
तसेच यावर्षी एप्रिल 2025 मध्ये बँकेने शेतकऱ्यांच्या पीक कर्जामध्ये 10 टक्क्यांची वाढ केली आहे. हादेखील फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना केले.
पुढे ते म्हणाले की, आम्ही यापूर्वीही शाखा व्यवस्थापकांवर किंवा सभासदांमध्ये पत्रव्यवहार केला होता की, शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज शून्य टक्के व्याज दराने मुद्दल भरावं आणि पुन्हा कर्ज घ्यावं. मात्र, काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तीनही दिवस बँका सुरू राहणार –
29, 30 आणि 31 मार्च रोजी सुट्टी असल्याने बँकेने जळगाव जिल्ह्याभरातील सर्वच्या सर्व शाखा सुरु ठेवाव्यात असे आदेशही आम्ही शाखा व्यवस्थापकांना दिलेले आहे. तसेच आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत, यांनी त्या शाखेत बसून शेतकऱ्यांचं मुद्दल कर्ज घ्यावं, असेही आदेश दिले आहेत, अशी माहिती संजय पवार यांनी यावेळी दिली.