संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 16 मे : जळगाव जिल्ह्यात शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पारोळा तालुक्यातील चोरवड येथून शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, याकडे पोलिस प्रशासन लक्ष देणार का?, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पोखरा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी शेततळे तयार केले आहेत. यामध्ये जो वाटरप्रूफ कागद वापरला जातो, ठिकठिकाणी तो कागद चोरी होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पारोळा तालुक्यातील चोरवड येथून बालू बारकू जगताप, विनोद रविंद्र पाटील आणि भारतीबाई रविंद्र पाटील यांच्या शेतातून शेततळ्यातील वाटरप्रूफ कागदाची चोरी झाल्याची घटना घडली. दरम्यान, गेल्या महिनाभरात चोरवड येथून तीन शेततळ्यातील वाटरप्रूफ कागदाची चोरी झाल्याचे समोर आले आहे.
चोरवड येथील सरपंच पती राकेश पाटील यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, पाणी साठवणुकीसाठी पोखरा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी शेततळे तयार केले आहेत. सरकारकडून शेततळ्यासाठी जरी अनुदान मिळत असले तरी 50 टक्कांच्यावर खर्च हा शेतकऱ्याला करावा लागतो. असे असताना त्या शेततळ्यांमधील वाटरप्रूफ कागद चोरी आहेत. गेल्या महिन्याभरात वाटरप्रूफ कागद चोरी झाल्याची ही तिसरी घटना असून आतापर्यंत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिस प्रशासन लक्ष देणार का? –
वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याचे चोरवड येथील सरपंच पती राजेश रमेश पाटील यांनी सांगितले. तसेच शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान प्रशासनाने थांबवावे आणि पोलिसांनी ताबडतोब विशेष लक्ष देऊन चोरट्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी चोरवड येथील ग्रामस्थ मल्हार कुंभार, पंकज पाटील, शरद निंबा, सोपान पाटील, रवींद्र कुंभार, दुर्गेश पाटील, विनोद पाटील,आदी उपस्थित होते.
शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ –
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील भडगाव आणि पारोळा तालुक्यातील अनेक शेततळ्यातून वाटरप्रूफ कागद चोरी झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून यावर पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन चोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.