लंडन/वाशिम, 29 फेब्रुवारी : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेडगावचा रहिवासी वैभव सोनोने या विदर्भातील सुपुत्राचा लंडनमध्ये ब्रिटिश कौन्सिलच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. आदीवासी समाजासाठी आतापर्यंत केलेल्या सर्वांगीण कार्यासाठी त्याला India-UK Achievers Honours हा सन्मान देण्यात आला. दरम्यान, वैभवचा लंडनमध्ये झालेल्या या गौरवामुळे वाशिम जिल्ह्यासह विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लंडनमध्ये वैभवचा गौरव –
ब्रिटिश कौन्सिल, व्यापार-व्यवसाय विभाग ब्रिटिश सरकार आणि यूके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NISAU) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात 28 फेब्रुवारीला लंडन येथे वैभवला India-UK Achievers Honours हा सन्मान देण्यात आला. वैभव यामध्ये फायनलिस्ट होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सन्मानाची घोषणा 27 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या संसदेत करण्यात आली.
कोण आहे वैभव सोनोने? –
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेडगावचा रहिवासी असणाऱ्या वैभव सोनेनेचे आई-वडिल गणेश आणि विमल सोनोने हे बांधकाम मजूर म्हणुन काम करतात. संत सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैभवने फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्याने बंगलोर येथील अज़ीम प्रेमजी विद्यापीठातून डेव्हलपमेंट विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
ग्रामीण आदिवासी क्षेत्रात काम करण्याचा निर्धार –
राष्ट्रीय संस्थानातून पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर वैभवकडे मोठ्या पगाराची नोकरी घेण्याचा पर्याय होता पण समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ग्रामीण-आदिवासी क्षेत्रात काम करायचा निर्धार त्याने पक्का झाला. शिक्षण घेत असताना मेळघाट येथे पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्याकडे युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देश्याने आयोजित होत असलेल्या ‘तरुणाई’ शिबिरांचा समन्वयक म्हणून त्याने काम पाहिलं आहे. डॉ. कोल्हे दांपत्याच्या सहवासात त्याचा ग्रामीण-आदिवासी क्षेत्रात काम करायचा निर्धार पक्का झाला.
वैभवने प्रदान संस्थेच्या माध्यमातुन मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या गावात काम करायला सुरवात केली. धमनपाणी गावात 2018 मध्ये पाण्याची सगळ्यात मोठी समस्या होती. हंडाभर पाण्यासाठी महिला 3-4 किमी चालत जायच्या किंवा गावातल्या एका विहरीवर 20-22 तास वाट पाहत बसायच्या. कामाच्या शोधात गावातील 90% लोकं बाहेरच्या शहरात स्थलांतर करायचे आणि जवळपास 80% महिला ऍनीमिक होत्या. जुलै 2018 मध्ये वैभववर दोन वेळा जिवघेणा हल्ला झाला तरीही त्याच गावात राहायचा त्याचा निर्धार पक्का होता. वैभवचा नेहमी प्रयत्न होता की, संस्थागत मदतीपेक्षा ‘हक्क आणि अधिकाराच्या’ बाबतीत इथल्या आदिवासी समुदायाने जागरूक व्हावे.
मागच्या पाच वर्षात नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर, संस्थेची थेट मदत आणि सरकारी योजनांची (विशेषत: रोजगार हमी योजना) प्रभावी अंमलबजावणी करत गावक-यांच्या मदतीने वैभवने या गावाचा कायापालट केला आहे. आजच्या घडीला गावात बारा महीने पिण्याचे पाणी उपलब्ध आहे, रोजगाराच्या शोधातील स्थलांतर 20-25% वर आले आहे. किचन गार्डन सारख्या उपक्रमातुन महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाल्या आहेत. आता गावात मुबलक वीज आहे तसेच पक्का रोड झाला आहे.
पाच वर्षांपूर्वी ‘कालापाणी’ म्हणून ओळखल्या जाणा-या धमनपाणी गावात आता आजूबाजुच्या जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि अनेक लोकं इथल्या बदलाची प्रक्रिया समजुन घ्यायला येतात. इथे काम करतांनाच जागतिक पर्यावरण धोरणांचा आदिवासी समुदाय, शेतकरी आणि महिला यांच्या जीवनावर होणारा परिणाम समजुन घेवुन त्यावर विस्तृत अभ्यास करण्याची जाणीव वैभवला झाली.
युकेत घेतोय उच्चशिक्षण –
वैभव सध्या यूकेमधील लीड्स विद्यापीठात पर्यावरण आणि विकास या विषयात एमएससी शिकत आहे. याच्या तयारीसाठी एकलव्य संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामने वैभवला मार्गदर्शन केले होते. मागच्यावर्षी वैभवला ब्रिटिश सरकारच्या कॉमनवेल्थ शेअर्ड आणि चेवनिंग अशा दोन्ही स्कॉलरशिप जाहिर झाल्या होत्या. त्यापैकी कॉमनवेल्थ शेअर्ड हि स्कॉलरशिप वैभवने निवडली.
यूकेमध्ये शिकत असतांना अभ्यासासोबतच अनेक महत्वाच्या गोष्टीमध्ये वैभवने आपली छाप उमटवली आहे. तो सध्या त्याच्या विषयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ‘राष्ट्रीय विद्यार्थी संघ’ डेलीगेट्सच्या निवडणुकीत वैभवने विजय मिळवला असुन आता तो यूकेमध्ये राष्ट्रीय स्तरावर लीड्स विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल.
यूकेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदाय-शेतकरी आणि महिला यांच्या संबंधित पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या प्रश्नांवर काम करायचा निर्णय वैभव याने घेतला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी त्याची पार्टनर स्नेहल हिने देखील ‘शिक्षक आणि समुदाय यांचा समन्वय साधत सर्वांगीण बदलासाठी सर्वांगीण शिक्षण यावर काम करायचे ठरवले आहे.
आदीवासी महिलांना सन्मान समर्पित –
इंग्लंडच्या संसदेत होणारा हा सन्मान हा वैभवने ‘धमनपाणीच्या सगळ्या स्त्रियांना’ समर्पित केला आहे. “पर्यावरणाला विकासाचा केंद्रबिंदु न मानता आखली जाणारी धोरणे आणि कायदे हे अप्रासंगिक आहेत. येत्या काळातील जागतिक राजकारण आणि समाज जीवन हे नैसर्गिक साधन संपत्तीच्या मुद्द्याभोवती केंद्रीत असणार आहे. अशावेळी ज्याच्या जगण्यावर याचा सर्वाधिक परिणाम पडेल अशा आदिवासी-शेतकरी आणि महिलांची बाजु मांडत त्यांच्या क्षमतावर्धन करण्यावर आम्हा दोघांचा भर असेल,” अशी प्रतिक्रिया त्याने सुवर्ण खान्देश लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा : विदर्भाच्या वैभवने करुन दाखवलं! एकाच वेळी मिळवल्या 2 जगप्रसिद्ध स्कॉलरशिप्स