जळगाव, 29 डिसेंबर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित केलेल्या किर्तनात त्यांनी केलेल्या विधानाने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
काय म्हणाले इंदुरीकर महाराज? –
जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या किर्तन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो, असा एकही माणूस राहिला नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाही. मात्र, माझा एकच गुण आहे की मी खरे बोलतो आणि खर बोललो की त्याची फळं भोगतो, असे वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले आहे.
जळगावात किर्तनाचे आयोजन –
जळगावातील महाबळ परिसरात नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज बोलत होते. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचे ध्यान आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्या शिवाय राहत नाही, असेही यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले.