जळगाव, 16 फेब्रुवारी : स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदरात दिवसा 80 पैसे ते एक रुपया प्रतियुनिट सवलत देण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घेत कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन –
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत रविवारी (१५ फेब्रुवारी) धरणगाव उपविभागाअंतर्गत बोरगाव बु. येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 3 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार व राज्य सरकार वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणे हा ग्राहकांच्या हिताचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिल मिळणार आहे. स्मार्ट मीटर पूर्णतः मोफत आहे. अनेक अफवा या मीटरबाबत आहेत. मात्र त्यावर विश्वास ठेवू नये. हे मीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापवरावर 80 पैसे ते 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळत आहे. यामुळे ग्राहकांचे बिल कमी होणार आहे. बिल जास्त येईल याची लोकांमध्ये भीती आहे. पण ती भीती काढून टाका.
ऑटोमॅटिक रीडिंगमुळे चुकीचे बिल बंद होणार असून, यामुळे ग्राहकांचा मनस्ताप टळणार आहे. हे मीटर प्री-पेड नसून, पोस्टपेडच आहे. स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बिल ही वस्तुस्थिती नसून, बिलात बचत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गैरसमज न बाळगता सर्व नागरिकांनी स्मार्ट बसवण्यासाठी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमास महावितरणच्या धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरगावचे सरपंच भैय्या मराठे यांनी केले.
हेही वाचा : पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे






