जळगाव, 30 डिसेंबर : म्हसावद व आजूबाजूच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून येथे येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाऐवजी त्याठिकाणी भुयारी मार्ग बांधणे सोयीचे राहील. यासाठी सार्वजनिक बांधकाम व रेल्वे बांधकाम विभागाने समन्वय ठेवत भुयारी मार्ग उभारण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वेला पैसे उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक –
जिल्हाधिकारी कार्यालयात आज म्हसावद रेल्वे भुयारी मार्ग, गिरणानदीवरील बांभोरी येथे बंधारासह पूल बांधणे या कामांचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पीत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, रेल्वेचे उपअभियंता पंकज धावरे, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, प्रांताधिकारी महेश सुधळकर, म्हसावद गावचे सरपंच गोविंदा पवार, शितलताई चिंचोरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आबा चींचोर, बापू धनगर, तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे –
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, म्हसावद रेल्वे भुयारी मार्ग उभारण्यासाठी शासनपातळीवर निधी उपलब्धता व परवाग्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयपातळीवर स्वतंत्र बैठक ही आयोजित करण्यात येईल. म्हसावद भुयारी मार्ग झाल्यास लमाणजण, कुरादे, वाकडी, बोरनार, नागदुली आदी १० खेड्यांना सोयीच्या दळणवळणासाठी फायदा होणार आहेत.
पूलाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा –
यावेळी गिरणानदीवर बांभोरी येथे कांताई बंधाऱ्याच्या धर्तीवर बंधारासह पूल उभारण्यात यावा. याबाबत पाटबंधारे विभागाने अडचणींचे निराकरण करून बंधारासह पूलाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. म्हसावद येथे भुयारी मार्ग बांधण्यास रेल्वे विभागाने सकारात्मक दाखविली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर, महसूल, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे अधिकारी व ग्रामस्थांनी म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपूल ठिकाणी जात पाहणी केली.