जळगाव, 10 जुलै : जळगाव जिल्हा कारागृहातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खून प्रकरणात जळगाव जेलमध्ये कैदी असलेल्या आरोपीची अंतर्गत वादातून हत्या करण्यात आली. मोहसीन असगर खान (वय 34) असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे. दरम्यान, या खळबळजनक घटनेने कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 मध्ये भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय 55) यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर एका टोळक्याने हल्ला केला होता. पुर्व वैमनस्यातून रवींद्र खरात यांच्यासह एकूण 5 जणांचा यामध्ये बळी गेला होता. यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती आणि ते सध्या जळगाव कारागृहात आहेत.
जळगाव जेलमध्ये कैद्याचा खून –
रविंद्र खरात खून प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू असल्याने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने मोहसीन असगर खान याच्यावर हल्ला चढवला. यात मोहसीन असगर खान गंभीर जखमी झाला. असगरला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
संशयित आरोपीची चौकशी सुरू –
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्यांनी कारागृहाकडे धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी संशयित आरोपीची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, जळगाव कारागृहात थेट जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा