जळगाव, 19 डिसेंबर : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे Sunstroat Green technology Pvt Ltd या कंपनीचे 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट उभारण्यात आले आहे. दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते हा सोलर प्लांट कार्यान्वित करण्यात आला.
सदर उद्घाटन प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक(गृह) आव्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, जि.वि.शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार आदी उपस्थित होते.
वीज बिल खर्च कमी होणार –
पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक जळगाव भाग जळगाव यांचे कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, जिल्हा विशेष शाखा अशा विविध शाखा असून सर्व शाखा या संगणीकृत करण्यात आलेले आहेत. तसेच सदरच्या शाखेमध्ये जवळपास महिन्याकाठी अंदाजे 10000 ते 11000 युनिट्स वीज खर्च होत असते.
आता नव्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातील छतावर 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 184 सोलर प्लेट बसवलेल्या असून, सोलर प्लांट मुळे दिवसाला कमीत कमी 300 युनिट्स वीज व उन्हाळ्यात 400 ते 450 युनिट तयार होणार आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वीज बिल खर्च कमी होणार असून अधिकची वीज तयार होणार आहे.






