जळगाव, 11 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक काल शनिवारी पार पडली. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
441 मतदारांनी केले मतदान –
काल झालेल्या या निवडणुकीसाठी 7 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यामध्ये 441 मतदारांनी मतदान केले. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत फक्त 18 टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जवळपास 95.23 टक्के मतदान पार पडले. एकूण 19 जागांसाठी हे मतदान झाले. यामध्ये सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजय आमचाच होणार, असा केला आहे.
आज रविवारी जळगाव येथे श्री सत्य वल्लभ भवन येथे ही मतमोजणी करण्यात येणार आहे. या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली.
मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरूद्ध गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील असा वाद होताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या मतमोजणीकडे उमेदवारांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.