जळगाव, 21 एप्रिल : जळगाव शहर आणि शहराजवळ असलेल्या गावांसाठी लवकरच पीएम ई-बस सेवा सुरू होणार आहे. पीएम ई-बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला 50 ई-बसेस मंजूर झाल्या असून यासाठी 18 मार्गांची निश्चिती करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिलीय.
महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे काय म्हणाले? –
जळगावाच्या ई-बस सेवेबाबत महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे म्हणाले की, पीएम ई-बस जळगाव महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 50 ई-बसेस मिळणार असून त्यासाठी रूटची निश्चिती करण्यात आलीय. ई-बस सेवेच्या मार्गांसाठी नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार18 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
जळगावातील ई-बस सेवेसाठी वर्कशॉप, पार्किंग तसेच चार्जिंग स्टेशन, अशी विविध कामे सुरू असून सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत ती कामे पुर्ण होणार आहेत. तत्पुर्वीच, 50 बसेस जळगावात येणार आहेत. सप्टेंबर अखेर नंतर जळगाव शहर महानगर पालिका हद्दीत तसेच लगतच्या भागात ई-बस सेवा देण्यात येणार असल्याची माहीती देखील महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिलीय.
जळगावसाठी मिळणार 50 ई-बसेस –
जळगाव महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानाच्या जागेत बस डेपो उभारण्याच्या कामाला गती आली असून जुने बसस्थानकातून या बसेस सुटणार आहेत. याच ठिकाणाहून प्रशासनाने सध्या 18 मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरीनंतर जळगावात ई-बस सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.