नवी दिल्ली, 31 जुलै : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी काल 30 जुलै रोजी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याचा मुद्दा उपस्थित केला. सुरत-भुसावळ एक्सप्रेस तसेच देवळाली-भुसावळ एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांच्या वेळेत कोविड काळानंतर बदल झालाय. मात्र, सध्यास्थितीत प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे सदर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केलीय.
खासदार स्मिता वाघ काय म्हणाल्या? –
लोकसभेत बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, माझ्या जळगाव लोकसभेतील जनतेच्या गंभीर असुविधेबाबत सभागृहाचे लक्ष वेधू इच्छिते. गाडी क्र.19005 सुरत-भुसावळ एक्सप्रेस या गाडीचे उधणा रेल्वेस्थानकावरून 11 वाजून 27 मिनिटांनी प्रस्थान होत होते आणि सकाळी 8 वाजून 45मिनिटांनी जळगाव येथे पोहचत होती. मात्र, 2019 च्या कोविडनंतर सकाळी 7 वाजता पोहचत आहे. या बदलामुळे दोंडाईचा आणि धरणगावमधील विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे गैरसोय होत आहेत. सदर गाडीने प्रवास करण्यासाठी सकाळी 3 वाजता उठून तयारी करावी लागते ज्यामुळे त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतोय.
दरम्यान, 19005 सुरत-भुसावळ एक्सप्रेस ही जर उधणा या स्थानकावरून मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी सुरू केली तर सकाळी 8 वाजून 45 मिनिटांपर्यंत ही जळगाव स्थानकावर पोहचण्याची शक्यता आहे.
देवळाली-भुसावळ एक्सप्रेसबाबत खासदार काय म्हणाल्या? –
गाडी क्र. 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी चाळीसगाव आणि पाचोरा रेल्वेस्थानकावर अनुक्रमे सकाळी 7 वाजून 40 मिनिटे, 8 वाजून 30 मिनिटे या वेळेत पोहचत होती. मात्र, आता या गाडीला दोन तासांचा उशिर होत आहे. यामुळे चाळीसगाव तसेच पाचोरा तालुक्यातील जवळपास 5 हजारांहून अधिक विद्यार्थी, महिला, नोकरदार, व्यापारी तसेच शेतकऱ्यांवर याचा परिणाम होत असून मजबुरीने त्यांना पर्यायी तसेच असुरक्षित वाहनाने प्रवास करावा लागतोय. ज्यामुळे आर्थिक तसेच सामाजिक जोखीम वाढत असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी –
सुरत-भुसावळ तसेच देवळाली-भुसावळ एक्सप्रेस ह्या दोन्ही रेल्वे गाड्या वेळपत्रकानुसार चालविल्या गेल्या पाहिजे. ज्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलासा मिळावा आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी मागणी स्मिता वाघ यांनी केली.