जळगाव, 10 नोव्हेंबर : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्रांची असते. ही केंद्रे ग्रामीण जनतेचा आरोग्याशी निगडित पहिला संपर्कबिंदू असल्याने त्यांची कार्यक्षमता आणि उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी तसेच नियुक्त कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. आता त्या दररोज व्हिडिओ कॉलद्वारे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा थेट आढावा घेणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राशी थेट संपर्क साधून वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित आहेत का, आरोग्य केंद्रातील सेवा व्यवस्थित सुरू आहेत का, तसेच रुग्णांना आवश्यक सुविधा वेळेवर मिळत आहेत का, याची खात्री करून घेतील. या नव्या उपक्रमामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये शिस्तबद्धता निर्माण होऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढून आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि जनकेंद्री होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : Jalgaon Crime : जळगावात जुन्या वादातून गोळीबार; तरूणाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी






